अन्नधान्यातील
भेसळ आणि ती ओळखण्याची पद्धत
चांगल्या प्रतीच्या अन्नधान्य आणि इतर मालाची
गुणवत्ता कमी करणे म्हणजेच भेसळ. विक्री करावयाचा कोणताही उत्तम प्रतीचा
माल (त्यात इतर पदार्थ मिसळून, किंवा
त्यातील कार्यकारी घटक काढून) तो कनिष्ट प्रतीचा करून तो चांगल्या
प्रतीचाच असल्याचे दर्शविणे, यास भेसळ करणे असे म्हणतात. अशी भेसळ
करण्यामागे जास्तीचा अधिक नफा मिळविणे हाच प्रमुख हेतू असतो.
साधारणतः असे पाहिले जाते कि, अन्नधान्यामध्येहि
भरपूर प्रमाणात भेसळ केली जाते. त्यात प्रामुख्याने बाह्य पदार्थ जसे कि
खडे, माती, लोखंडाचा
चुरा, निकृष्ठ धान्य आदी मिसळले जाते. कधीकधी
तर यामध्ये किडे आणि लेंड्या हि आढळतात, ज्यापासून अनेक विकार होण्याची शक्यताही असते.
यातील काही भेसळ हे आपणाला डोळ्यांनी
पाहून हि समजते तर काहींसाठी आपणाला चाचणी पद्धतीचा अवलंब करावा लागतो. आता
आपण अन्नधान्य आणि उत्पादने यामधील भेसळ आणि ती ओळखण्याची पद्धती यावर सविस्तर
चर्चा करू.
१. अन्नधान्यात बाह्य पदार्थाची भेसळ:
साधारणतः असे पाहण्यात येते कि अन्नधान्यामध्ये
बाह्य पदार्थाच्या भेसळीचे प्रमाण सर्वात जास्त आढळते. यात
माती, पेंढ, छोटे
दगड, खडे, तण
बियाणे, कीटक, लेंढ्या, खराब
ध्यान्य इत्यादी बाह्य धान्याची भेसळ होते.
हि
भेसळ ओळखण्यासाठी थोडे धान्य एका काचेच्या प्लेट मध्ये घेऊन त्यात अशुद्ध असणाऱ्या
धान्याचे सर्वेक्षण करावे. शुध्द अन्नधान्य मध्ये कसलीच विशुद्धी
दिसत नाही. परंतु भेसळ केलेली असल्यास आपणाला ती
उघड्या डोळ्याने हि दिसते.
२. अन्नधान्यात धोतऱ्याच्या बियांची भेसळ:
थोडे धान्य एका काचेच्या प्लेट मध्ये घ्यावे. धोतऱ्याचे
बी हे सपाट कडेदार असून ते तपकिरी काळसट रंगाचे असते. सुक्ष्म
सर्वेक्षण चाचणीने म्हणजेच उघड्या डोळ्यांनी व्यवस्थित निरीक्षणाने आपण ही भेसळ ओळखू शकतो.
३. रव्यामध्ये लोखंडाचा चुरा:
रव्यामध्ये वजन वाढवण्यासाठी लोखंडाचा
चुरा मिसळला जातो. रवा एका परातीत विखरून त्यावर लोहचुंबक फिरवून
लोखंड वेगळे काढता येते.
४. गव्हाच्या पिठात जादा कोंड्याची भेसळ:
हि भेसळ तपासण्यासाठी एका काचेच्या
ग्लासमध्ये पाणी घ्यावे. थोडेसे गव्हाचे पीठ पाण्यावर विखुरावे. शुध्द
पिठात पाण्यावर जास्तीचा कोंडा दिसणार नाही. परंतु, भेसळ
असलेल्या गव्हाच्या पिठात जास्तीचा कोंडा तरंगताना दिसेल.
५. अन्नधान्यात अतिरिक्त रंगाची भेसळ:
यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी
घेऊन त्यावर थोडे अन्नधान्याचे कण टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे. शुद्ध
प्रतीच्या धान्यामध्ये पाण्याला अथवा मिश्रणाला रंग येणार नाही. परंतु, भेसळ
असणाऱ्या मिश्रणात धान्यकण रंग सोडताना दिसतात.
६. संपूर्ण आणि फोड डाळीत केसरी डाळची भेसळ:
यात थोडी संपूर्ण डाळ किंवा फोड डाळ एका
प्लेट मध्ये घेऊन त्याचे निरीक्षण करावे. केसरी डाळच्या किनाराला थोडी धार असून ती
एका बाजूने तिरकस तर दुसऱ्या बाजूने चौकोनी आकाराची असते.
अशाप्रकारे सुक्ष्म निरीक्षणाने आपण ती डाळ भेसळयुक्त आहे किंवा नाही हे ठरवू शकतो.
७. थोड्या उकळलेल्या तांदळामध्ये हळदीची
भेसळ:
चमचाभर तांदूळ प्लेट मध्ये घेऊन त्यावर
खाण्याचा चुना शिंपडावा. शुध्द तांदूळला लालसर रंग येणार नाही
परंतु लाल रंग आला म्हणजे भेसळ आहे असे स्पष्ट होते.
आणखी एका चाचणीसाठी थोड्या भाताचा नमुना
टेस्टट्यूब मध्ये घेऊन त्यावर थोडे पाणी घालून मिश्रण हलवावे. बोरिक
आम्लामध्ये बुडवलेला फिल्टर पेपर मिश्रणात नेला असता, त्याचा
रंग गुलाबी झाला तर त्यामध्ये भेसळ आहे असे समजावे.
८. मैद्यामध्ये उरलेले किंवा निकृष्ठ
दर्जाचे पिठाची भेसळ:
जेव्हा पिठाचा लगदा हा उरलेल्या किंवा
स्वस्त अशा निकृष्ठ पिठापासून बनवला जातो तेव्हा पीठासाठी जास्त पाण्याची गरज
लागते. तसेच तयार झालेल्या पदार्थाला चव लागत
नाही.
९. मेटालिक यलो रंगाची तुरडाळ, मुगडाळ
मध्ये भेसळ:
मेटॅलिक यलो हा अपायकारक रंग तुरडाळ, मुगडाळ
किंवा चणा डाळीवरपण वापरला जातो. हे
तपासण्यासाठी थोड्या कोमट केलेल्या पाण्यात डाळ टाका. हे
पाणी वेगळे काढून त्यात हायड्रोक्लोरिक आम्लाचे थोडे थेंब
टाका. मिश्रणाला गुलाबी रंग प्राप्त झाल्यास भेसळ आहे असे समजावे.
१०. नाचनीमध्ये रोडामाईन ‘ब’ ची
भेसळ:
मुख्यतः रोडामाईन ‘ब’ चा वापर हा नाचनीच्या बाह्य भागाला रंग
देण्यासाठी केला जातो.
हि भेसळ ओळखण्यासाठी प्रथम पाण्यात किंवा
तेलात भिजविलेला कापसाचा गोळा घ्यावा. तो गोळा नाचणीच्या बाह्य पृष्ठभागावर
थोडा रगडावा. जर कापसाच्या बोळ्याने रंग शोक्षून घेतला
तर रोडामाइन ब ची भेसळ झालेली आहे असे समजावे.
११. सर्व प्रकारच्या डाळीमध्ये लीड क्रोमेट
ची भेसळ:
थोडी डाळ आणि पाणी एकत्र करून त्यात हायड्रोक्लोरिक आम्लाचे काही थेंब
टाकावे. मिश्रणाला गुलाबी रंग आला असता लीड क्रोमेट
ची भेसळ आहे असे लक्षात येते.